निवेदन

( कुलवृत्तांत १९५३ )
श्री. श्रीपाद बाजी
श्री. रंगनाथ भिकाजी व
कांही चित्तपावन कुलांचे वृत्तान्तग्रंथ माझ्या पाहाण्यांत आले व त्यांतील माहिती मला आकर्षक उद्बोधक वाटली. त्यामुळे आपला जोग कुल-वृत्तान्तही प्रसिद्ध व्हावा अशी प्रेरणा झाली, म्हणून काही स्थानिक जोगमंडळींजवळ मी ही गोष्ट पहिल्याने काढली. त्या मंडळीपैकी श्री. रंगनाथ भिकाजी तथा नानासाहेब जोग, मेकॅनिकल एंजिनिअर पुणे, यांनी मला विशेष प्रोत्साहन देऊन सहकार्याचा हात पुढे केला. वृत्तान्ताच्या कामी मी मुख्यतः पुण्याबाहेरच्या जोग मंडळींशी पत्रव्यवहार करावा व नानासाहेब जोग यांनी पुण्यातील जोग मंडळींस भेटून त्यांची माहिती मिळावावी असे आम्ही ठरविलें. जोग-कुल-वृत्तान्तासंबंधी पहिले विनंतीपत्रक, चवदा जोग कुलबंधूंच्या नांवावर, पहिल्याने त्यांची संमति आणून, सन १९४५ च्या सप्टेंबर महिन्यांत काढले. वृत्तान्तासाठी माहिती गोळा करण्याच्या कामास आरंभ करण्यापूर्वी त्या कामांतील तज्ज्ञ श्री. कृष्णाजी विनायक पेंडसे, श्री. विष्णुशास्त्री परांजपे यांसारख्या गृहस्थांच्या गांठी घेतल्या व त्यांनी केलेल्या सूचनांस अनुसरून कामाची आखणी केली. म्युनिसिपल कॉलनी, पुणे ४ येथे माझे घरी कार्यालय केलें. 

वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या, विधिमंडळे, नगरपालिका, लोकलबोर्डे यांच्या मतदारांच्या याद्या, मॅट्रिक व इतर परीक्षांच्या उमेदवारांच्या याद्या, सार्वजनिक संस्थांची इतिवृत्ते व सभासदांच्या याद्या इत्यादींवरून जोग मंडळींची नांवे व पत्ते गोळा केले. त्यानंतर वृत्तान्ताकरिता माहिती भरावयाचे छापील तक्ते विनंतीपत्रकासह जोग मंडळींकडे पाठविण्यास आरंभ केला. त्यांपैकी जे तक्ते भरून आले, त्यांवरून जोग मंडळींची नांवें व पत्ते मिळाले व त्यांच्याकडेही तक्ते पाठवून दिले. अशा प्रकारे सन १९४५ च्या १९४७ च्या मार्चपर्यंत वृत्तान्ताच्या प्राथमिक कामांपैकी बरेच काम केले. 

पुष्कळ पत्रव्यवहारही केला. त्या अवधीत श्री. रंगनाथ भिकाजी ऊर्फ नानासाहेब जोग यांनी पुण्यातील बहुतेक जोग मंडळींकडून माहितीचे तक्ते भरून आणिले. १९४७ मार्चपर्यंत दीड वर्षांत पत्रव्यवहाराची जावक संख्या ७०० व आवक
संख्या ४०० झाली. पुण्यातील व बाहेरील असे एकूण सुमारे १५० तक्ते भरून आले. त्र्यंबकेश्वराहून कै. रा. चिंतोपंत दातारशास्त्री यांनी तेथील क्षेत्रोपाध्यायांकडून पांचशें नामावळ्या सन १९४० मध्ये आणिल्या होत्या,
त्यांवरून घराण्यांच्या वंशावळी तयार केल्या. त्या चाळीस झाल्या. त्यांतील व्यक्तींच्या सूचीची दोन हजार कार्डे तयार केली. 

प्राथमिक खर्चाकरितां सहाशें पंचवीस रुपये आगाऊ देणगी म्हणून गोळा केले. त्यांपैकी निम्मे माझे हातून
वृत्तान्ताच्या कामी खर्च झाले. सन १९४७ च्या मार्चपर्यंत दीड वर्ष काम करूनही कामाचा विशेष उरक होईना. माहितीचे तक्ते भरून येण्यांत दिरंगाई झाली. कांहीं तक्ते भरून आलेच नाहीत. अशा परिस्थितीत आपल्या हातून
काम तडीस जाणार नाही असे वाटू लागले. वार्धक्य व वाढतें दृष्टिमांद्य यांच्यामुळेही मी हतबुद्ध झालो. 

अशा परिस्थितीत वृत्तान्ताच्या कामांत खंड पडला व १९४७ च्या मार्चपासून ते स्थगित होऊन बसलें. भाग्यवशात् हे काम पुरे होण्याचा योग आला तो असा – माझे स्नेही शंकर रामचंद्र कानिटकर यांनी कानिटकर कुलवृत्तान्तसंपादनाचे काम सन १९४८ च्या ऑक्टोबर महिन्यांत पुरें केलें होते. त्यांना विनंती करून जोग-कुल-वृत्तान्ताच्या स्थगित झालेल्या कामास
चालना मिळाली तर पाहावी असा विचार मनांत आला. 

एक दोन वेळां त्यांना भेटून प्रांजलपणे सर्व गोष्टी त्यांच्या कानांवर घातल्या व त्यांना अगत्यपूर्वक विनंति केली. सुदैवाने प्रा. शंकरराव कानिटकर यांचे दोन तीन जोग घराण्यांशी निकटच नात्याचे संबंध आलेले असल्यामुळे त्यांनी मन मोठे करून माझ्या विनंतीस मान दिला व जोग-कुल-वृत्तान्त-संपादनाचे काम करण्याचे मान्य केले. यामुळे प्रोत्साहित होऊन मी व श्री. नानासाहेब जोग यानी निवेदनात्मक असें दिनांक ३.११.१९४९ चे एक पत्रक छापून माहितीकरतां तें सर्व जोग मंडळींकडे पाठवून दिले. सन १९४९ च्या नोव्हेंबरपासून नव्या कार्यालयांत म्हणजे ६ बुधवार, देवांचा वाडा, पुणे २ येथे श्री. विष्णु विनायक परांजपेशास्त्री यांच्या वृत्तान्तकार्यालयांत प्रा. शंकरराव कानिटकर यांनी संपादनाच्या कामास आरंभ केला. या कामी श्री. विष्णुशास्त्री परांजपे यांचे जे विविध प्रकारचे साहाय्य झाले त्याचा उल्लेख प्रा. शंकरराव कानिटकरांनी आपल्या प्रस्तावनेत केलेला आहे.


हाती घेतलेल्या कामाचा पिच्छा पुरवून प्रा. शंकरराव कानिटकर यांनी ते मोठ्या आपुलकीने व कार्यक्षमतेने पार पाडिलें. या कामी चार वर्षांचा त्यांचा अमूल्य वेळ खर्ची पडला. प्रत्यहीं कार्यालयांत व कारणपरत्वे अन्य ठिकाणी जाण्यायेण्याचे कष्ट, माहिती हाती येण्यांत झालेल्या दिरंगाईमुळे होणारी कुचंबणा, वाढलेल्या पत्रव्यवहाराची दगदग, वृत्तान्त लिहिण्याच्या कामी तारतम्य राखण्यांत होणारा मानसिक शीण, ग्रंथासाठी देणग्या मिळविण्याच्या
कामाची आटापीट इत्यादि गोष्टींस तोंड देऊन संपादनाचे काम प्रा. शंकरराव कानिटकर यांनी उत्तम रीतीने पार पाडले. त्यांच्या या कामगिरीमुळे आपण सर्व जोगकुलबंधु कायमचे उपकृत झालो आहो. असेंच लोकोपयोगी काम प्रा. शंकरराव कानिटकर यांचे हातून घडत राहावे म्हणून परमेश्वराची प्रार्थना जोगकुलबंधुंच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. श्री. विष्णुशास्त्री परांजपे यांचेही हरघडी हरत-हेचे साहाय्य झाले त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार मानणे उचित होय.

वृत्तान्त लिहिण्याचा एक महत्त्वाचा हेतु म्हणजे कुलबंधूंत परस्पर परिचय होऊन संघटन व्हावें व समाजाचे सामर्थ्य वाढावे हा होय. हा हेतु मनांत वागविण्याची बुद्धि आपणा सर्वांस व्हावी अशी जगञ्चालकाची प्रार्थना करितो. करून सर्व

विजयादशमी,
शके १८७५
श्रीपाद बाजी जोग

Leave a Reply

Your email address will not be published.

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.