प्रस्तावना

(श्री. शंकरराव कानिटकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील महत्त्वाचा भाग पुढे दिला आहे. )
कुलवृत्तांत १९५३
श्री. शंकर रामचंद्र कानिटकर
कानिटकर कुलवृत्तान्ताचे काम सन १९४५ च्या मे महिन्यांत मी हाती घेतले, त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यांत माझे स्नेही श्री. श्रीपाद बाजी तथा बापूसाहेब जोग यांनी श्री. रंगनाथ भिकाजी तथा नानासाहेब जोग यांच्या सहकार्याने जोगकुलवृत्तान्ताच्या कामास आरंभ केला. कानिटकर-कुल-वृत्तान्ताचे काम मी सन १९४८ च्या ऑक्टोबर महिन्यांत हातावेगळे केले, त्यानंतर एक वर्षानें श्री. बापूसाहेब जोग यांनी माझी दोनतीन वेळां गांठ घेतली व जोगकुलवृत्तान्ताचे मागे पडलेले काम पुरें करण्याविषयी मला आग्रहाची विनंती केली. निरनिराळी तीन जोग घराणी माझ्या जवळच्या नात्यांतली असल्यामुळे व वृत्तान्ताचे अंशतः झालेलें काम अल्पावधीत उरकतां येईल असें वाटल्यामुळे प्रथम कुलवृत्तान्ततज्ज्ञ श्री. विष्णु विनायक तथा दाजीशास्त्री परांजपे यांच्याकडून सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन घेऊन मी या कामाच्या भरीस पडलों. श्री. बापूसाहेब व श्री. नानासाहेब जोग यांच्याकडून झालेल्या कामाची माहिती घेतली व सन १९४९ च्या नोव्हेंबरपासून मी ६ बुधवार, देवांचा वाडा, पुणे २ हया श्री. दाजीशास्त्री परांजपे यांच्या वृत्तान्तकार्यालयांत जोग-कुलवृत्तान्ताच्या कामास नव्याने आरंभ केला. मी हे काम हाती घेतले त्या वेळी मूळ कामास आरंभ होऊन चार वर्षे होऊन गेली होती. शिवाय अडीच वर्षे या कामांत खंड पडलेला होता. 

आलेली माहिती जुनी व अपुरी होती. काही पत्तेही बदलले होते. माहिती भरण्यास सोपे असे नवे छापील तक्ते अद्ययावत् माहितीसाठी पुन्हां सर्व जोगमंडळींकडे पाठविले. अधून मधून नवीन नांवें समजली त्या व्यक्तींकडेही तक्ते भरून येण्यापूर्वी कुलवृत्तान्त प्रत मुद्दाम लिहून घ्यावी लागली. हे सर्व काम शक्य त्या कसोशीनें व काटकसरीने पुरें केलें. ही झाली संपादनाच्या कामाची कहाणी. ग्रंथाच्या संपादनाचे काम एक प्रकारे स्वाधीनचे परंतु छापखान्याकडून काम करून घेणे व आगाऊ होणाऱ्या खर्चासाठी देणग्या मिळविणे ही दोन्ही कामें मोठी पराधीन. देणग्यांचा योग्य उपयोग होऊन ग्रंथ पुरा होतो की नाही, ही देणगी देणाऱ्यांच्या मनांत शंका येण्याचा संभव व तोही सकारण. देणग्या देऊनही वृत्तान्तग्रंथाचे काम अपुरे राहिल्याची एक दोन उदाहरणे होतीच. 

शेवटी श्री. दाजीशास्त्री परांजपे यांच्याशी विचारविनिमय करून असें ठरविलें कीं, देणग्या आगाऊ मागावयाच्या, तर निदान छपाईचे काम प्रगत झाल्यावर मागाव्यात. छपाईच्या कामास १९५२ च्या फेब्रुवारी महिन्यांत आरंभ झाला. १२८ पानें छापून झाल्यावर आगाऊ देणग्या व फोटो पाठविण्याबद्दल एक छापील विनंतीपत्र सर्व कर्त्या व मिळवत्या जोगमंडळींकडे पाठविले. कांहीं थोड्या लोकांकडून लगोलग देणग्या आल्या. विनंतीपत्र लिहून पुरे पडले नाही, अशांना विनवणीवजा पुन्हा पुन्हा लिहावे लागले. आगाऊ झालेल्या खर्चाच्या मानाने देणग्यांची रक्कम पुरेशी जमेना, तेव्हां मी काही काळ विमनस्क झालों.

 परंतु परमेश्वरकृपेनें विलंबाने का होईना, देणग्या हातीं येऊ लागल्या व या बाबतींतली विवंचना कमी होत गेली. (यापुढे ग्रंथाची रचना कशी केली आहे त्याबद्दल विस्तृत माहिती दिली आहे ती इथे दिलेली नाही.) वृत्तान्तग्रंथातील सूचीबद्दल तज्ज्ञ मंडळींची मते दिली आहेत. त्यावरून वृत्तान्त ग्रंथातील माहिती लगोलग सापडून तिचा उपयोग व्हावा वृत्तान्त ग्रंथाची आवृत्ती बहुधा पुनः निघणे कठीण सूचीसाठी होणारा हा खर्च एकदाच होणारा आहे. यासाठी सर्व जिवंत व मृत व्यक्तींची सूची  असणे इष्ट होय असाच निष्कर्ष निघतो. म्हणून सूची ही आवश्यकच होय. 

पुष्कळ जोग मंडळींनी माहिती अगत्याने कळविली. तसेच जोगांचे इष्टमित्र किंवा त्यांना ओळखणारे असे जोगांव्यतिरिक्त अनेक बाहेरगांवच्या इतर मंडळींनीही माहिती पुरविली. त्यामध्ये गुहागरचे सोहनी, बिलासपूरचे चक्रदेव, मुंबईचे अभ्यंकर, श्री. पोंक्षे, साने इत्यादि अनेक मंडळींचा सहभाग आहे. कोंकणांतील ज्या ज्या गांवीं जोगांचे वास्तव्य होते किंवा आहे, त्या त्या गांवच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांस पत्र पाठवून त्या गांवची माहिती मागविली व ती त्यांनी ताबडतोब पुरविली ही विशेष उल्लेखनीय बाब होय. त्यावेळच्या इतर कुलवृत्तान्त संपादकांनीही कार्यालयांत येऊन
वेळोवेळी विचारपूस करून प्रोत्साहन दिले. कु. कुसुम सोवनी म्हणजेच सौ. श्यामला सहस्रबुद्धे यांनी लेखन, मुद्रिते तपासणे, समालोचन प्रकरणाची तयारी, व्यक्तिसूची इत्यादि कामें उत्तम रीतीनें केली.

श्री. श्रीपाद बाजी ऊर्फ बापूसाहेब जोग व श्री. रंगनाथ भिकाजी  उर्फ नानासाहेब जोग यानी वेळोवेळी गांठ घेऊन संपादनाच्या कामाच्या प्रगतीबद्दल विचारपूस केली, व कांहीं जोगमंडळींकडून देणग्या मिळविण्याचे कामी साहाय्य केलें. 
वृत्तान्ताच्या सर्व बाबतींत श्री. दाजीशास्त्री परांजपे यांनी मोठ्या आस्थेवाईकपणे सर्व प्रकारचे साहाय्य केलें. ज्या ज्या वेळी कामाची कुचंबणा किंवा काही गोष्टींत अपेक्षाभंग झाल्यामुळे मी विमनस्क होई त्या त्या वेळी आपले अनुभव सांगून ते मला कार्यप्रवण करीत. आरंभापासून अखेरपर्यंत सतत साडेतीन वर्षांवर जोग-कुल-वृत्तान्त-ग्रंथ-पूर्तीच्या कामी जातीने कष्ट घेऊन त्यांनी जें बहुविध साहाय्य केलें, त्याबद्दली मी त्यांचा ऋणी आहे. त्यांचे आभार मानावे तितके थोडेच होत.
जोगमंडळींनी सहकार्य करून माझ्या हातून हे काम तडीस नेले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ज्या जोगमंडळींनी ग्रंथाचे मूल्य किंवा देणग्या आगाऊ दिल्या त्यांच्या मदतीशिवाय आगाऊ होणारा खर्च भागविता आला नसता. ग्रंथाची छपाई अडून राहिली असती. त्यांच्या मदतीचे महत्त्व विशेष होय ते आपल्या कुलबंधूंच्या धन्यवादास पात्र होत. प्रती पावणे पाचशे काढल्या असून एकूण खर्च पांच हजार रुपये झाला, म्हणजे प्रत्येक प्रतीस दहा रुपयांवर खर्च आला.

वृत्तान्तग्रंथांत भेदाभेद न करतां सर्व स्त्रीपुरुषव्यक्तींची माहिती दिलेली असते. ही गोष्ट लोकशाहीच्या मनूस शोभेशीच होय. व्यक्तींच्या कार्यक्षमतेत भर पडत जाऊन त्यांच्या जीवनाची पातळी कशी उंचावत गेली, व त्यांचे कार्यक्षेत्र कसे वाढत गेलें या गोष्टी वृत्तान्तग्रंथावरून अजमावतां येतात. सामाजिक उत्क्रांतीच्या अभ्यासकांत साधनग्रंथ म्हणून उपयोगी पडणाऱ्या अशा वृत्तान्तग्रंथसंपत्तींत जोगमंडळींच्या सहकार्याने भर घालतां आली, म्हणून मला समाधान वाटते. या ग्रंथपूर्तीमुळे एका सामाजिक कामगिरीचा माझा हा निष्कामकर्मयज्ञ पुरा झाला ही परमेश्वराची कृपा होय.
विजयादशमी,
शके १८७५
शंकर रामचंद्र कानिटकर

Leave a Reply

Your email address will not be published.

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.